Sunday, February 26, 2012

सिंहगड-राजगड-तोरणा-रायगड......"करून दाखवले"

१६ फेब्रुवारी २०१२

रात्रि ११.३० च्या ठाणे - स्वारगेट बसने जण (मी, आपटेकाका, रोहित, पिनाक, स्वाती) निघालो. बेलापुरला मंगेश, अनूप, सारंग भेटले.

१७ फेब्रुवारी २०१२

सव्वातीनला बस स्वारगेटला पोहोचली. सिंहगड बस ५च्या नंतर असल्याने तिथेच टाइम पास केला. च्या सुमारास रविराज आम्हाला येउन मिळाला आणि मोहिम संघ पूर्ण झाला.

स्वारगेट बस स्टैंडच्या समोर लोकल बसचा स्टैंड आहे. तेथून .४० ची सिंहगड बस पकडली (बस क्र. ५०). अर्ध्या तासात सिंहगडाच्या पायथ्याशी आतकरवाडीत पोहोचलो. ओळख परेड, नियमावली, वेळापत्रकाची महती, संभाव्य धोके .. माहिती दिली. .३५ ला सिंहगड चढायला लागलो. ला पुणे दरवाज्यातून सिंहगडावर दाखल झालो. आपटे काकांकडून दरवाज्यावरिल शिल्पांची माहिती घेउन पुढे निघालो. वाटेतील घोड्याची पागा (?), चर्च (कोठार) पाहून .२५ ला सोनार यांच्या होटेलात विसावलो. चहा-भजि-पोहे असा पोटभर नाश्ता करून घेतला. चहा - १० रु. , भजी पोहे - २५ रु. आहे पण वर शिधा आणून बनवण्याची मेहनत आणि त्याची चव याचा विचार करता, पैसा वसूल.

स्याका सोनारांकडे टाकून .१५ वाजता गड फेरी (संक्षिप्त) साठी निघालो. आपटे काकांकडून ऐतिहासिक माहिती घेत, टिळक बंगला, राजाराम महाराज समाधी, सतीशिळा, तानाजी (डोणगिरी) कडा, तानाजी स्मारक, अमृतेश्वर मंदिर, कोंडाणेश्वर मंदिर या स्थळांना भेट दिली.

आपटे काका सती शिळेची माहिती सांगताना. हा हात तानाजीन्चा  आहे असा चुकीचा समज आहे.

तानाजी (डोणगिरी) कडा येथून आजचे आमचे लक्ष्य 'राजगड' दिसत होता. तोरणाही समोरच होता. तासात हि संक्षिप्त गड फेरी आटोपून सोनारांकडे परतलो. खरे तर, आपटे काका बरोबर असताना सर्व वास्तू नीट पहायला अख्खा दिवस हवा. पण या वेळी आमचा उद्देश किल्ले नसून चार किल्ल्यांना जोडणारा मार्ग होता. सोनारांचा हिशेब करून, पाणी पिऊन १०.३० ला निघालो. पुढे देवटाक्यातील पाणी भरून घेतले आणि १०.४५ ला सिंहगड सोडला.

ज्या टेकडीच्या मागे राजगड (अंधुकसादिसत आहेतिला उजवीकडून वळसा घेऊन वाट विंझरकडे उतरते.


कल्याण दरवाज्यातून बाहेर पडून, झुंजार बुरुजाच्या खाली आलो. येथे माथ्याहून येणारी वाट मिळते. त्या वाटेने आल्यास कल्याण दरवाजा लागत नाही.

सिंहगड - विंझरच्या वाटेवरून

आता आमच्या नाकासमोरील (सिंहगडाकडे पाठ करून) डोंगररांगेवरून (रिज वरून) चालत त्या डोंगररांगेला आडव्या येणाऱ्या रांगेवर पोहोचायचे होते. येथे घ्यायची खबरदारी म्हणजे कुठेही रांगेवरून खाली उतरायचे नाही. एक वाट डावी कडे कल्याण गावात जाते, ती टाळली नाही तर काही खंर नाही. रांगेवरून चालत, मधे-मधे विश्रांती घेत, जिथे दोन्ही रांगा मिळतात, त्या 'T' जंक्शनला पोहोचलो. उन्हाचा कडाका असा होता कि मधे कारवीत घुसून अर्धा तास आराम केला.

विंझरच्या वाटेवर, टेकडी कडे वाटचाल.  

'T' जंक्शनला एक उंच टेकडी आहे. त्या टेकडीला डावीकडे ठेवत वळसा घातला आणि आडव्या आलेल्या डोंगररांगेवर आलो. टेकडीच्या पलीकडे असलेले विंझर गाव, आता समोर खाली दिसू लागले. wikimapia वर ही टेकडी, त्याचा वळसा आणि पुढची गावात उतरणारी वाट नीट मार्क केली आहे पण तिथे मार्क केलेला rock patch चुकीचा आहे. वाटेवर कुठेही rock patch नाही याची नोंद घेणे. आडवी डोंगर रांग सोडून विंझरकडे उतरणाऱ्या 'गवत-cum-घसारा' से लथ-पथ वाटेनी पडत-उतरत एका झापाशी पोहोचलो. वेळ दु. .४५.

टेकडीला वळसा मारून, विंझरकडे उतरताना

सोबत असलेल्या पाण्याचा stock घेतला आणि जेवायला बसलो. घरून आणलेला डबा उघडला आणि पेटपूजा उरकली, थोडीशी ताणूनही दिली.

अजून बराच पल्ला गाठायचा असल्याने, बळे-बळे सगळे उठले आणि पावणे तीनला झापातून निघालो. विंझर वाडीत उतरेतो .१५ वाजले. लगेचच कच्चा गाडी रस्ता लागला. उजव्या हाताला एक शाळा आहे. तिथे पहिला नळ दिसला. पाणीही होते. लगेच भरून घेतले. सिंहगड सोडल्यानंतर पाणी भरण्याची संधीच मिळाली नव्हती. तिथे पुढेच रस्त्यात अजून नळ आहे. १० मिनिटात पक्क्या रस्त्यावर आलो. विंझर गावात फडके हे बडे प्रस्थ आहे अशी माहिती आपटे काकांकडे होती, नेमके त्यांनी फडक्यांनाच 'फडक्यांचा वाडा' कुठे आहे असे विचारले. "गावांमध्ये अजूनही माणुसकी टिकून आहे" ही उक्ती सार्थ ठरवत फडक्यांनी आमची विचारपूस केली आणि आता चहा घेऊनच पुढे निघा असे प्रेमाने सांगितले. आम्ही नको-नको करत होतो, आजच राजगड गाठायचा आहे असे सांगितले पण ते काही ऐकेचनात. फडक्यांचा वाडा प्रशस्त आहे. समोरच गोठा आहे. रोज येथून पुण्याला दूध जाते. पुण्यात / मंगल कार्यालये ही आहेत फडक्यांची. अखेर चहा - पाणी झाले आणि .३० वाजता तिथून निघालो.

विंझर गावात रॉकेल मिळेल असा अंदाज बांधून रॉकेल बरोबर घेतले नव्हते. पण रॉकेल कुठेच मिळाले नाही. गावातून बाहेर पडून फाट्यावर आलो. मार्गासनी - वेल्हा डांबरी सडक ओलांडून शेताडीतून चालत-चालत (विंझर-साखर गावांच्या मधून जाणारी) कानंदी नदी पार केली. नदी पार केली आणि लगेचच साखरला आलो.

कानंदी नदी पार करताना - (फोटो सौजन्य - सारंग) 

साखर गावात रॉकेल मिळाले. आता गुंजावण्यापर्यंत डांबरी रस्त्यावरील कंटाळवाणी चाल होती. ती चाल संपवली आणि पुरोहितांच्या (अरण्यधाम) हॉटेलात पोचेतो सं. .३० झाले. पाय बोलायला लागले होते पण " पिक्चर अभी बाकी है, मेरे दोस्त " - असे वेळापत्रक बोंबलत होते. अर्ध्या तासात चहा बिस्कुटे खाऊन, मरगळ झटकून उठलो. रात्रीच्या जेवणासाठी (आज ४० उद्या ४०) ८० पोळ्या पुरोहितांकडून बांधून घेतल्या आणि १० जणांना पुरेल एवढी भाजी बरणीत भरून घेतली. हे सामान वाहण्यास कोणीच उत्सुक नव्हते. शेवटी "कठीण समय येता, लीडर कामास येतो" असे स्वत:ला समजावत पोळ्या माझ्या स्याक मधे टाकल्या आणि बरणी फिरत्या चषकाप्रमाणे घेण्याचे ठरले. तेवढ्यात तरुण - तडफदार सारंग भोसले माझी स्याक घ्यायला तयार झाला. हुश्श !! करत स्याकांची अदलाबदली केली आणि राजगड चढायला सुरुवात झाली. वेळ सं. .

अंधार पडल्याने, सर्वांनी एकत्र चालायचे होते. टोर्चच्या उजेडात धडपडता, पहिला टप्पा, दुसरा टप्पा, मग traverse आणि अंतिम खडी चढाई पार करत, चोर दरवाज्यातून पद्मावतीदेवी मंदिरात पोहोचलो. तेव्हा रात्रीचे .१५ वाजले होते. गुंजवण्यापासून वरपर्यंत वाटेत सौर उर्जेवर चालणार्या दिव्यांची सोय आहे पण त्याच्या batteries काढून नेल्याने, दिव्यांचा उपयोग शून्य. दिवसभर चालून दमल्यानंतरही राजगड चढलो होतो. पद्मावतीदेवी मंदिर फुल्ल होते. रामेश्वर मंदिरात जागा मिळाली, तेथेच पथार्या पसरल्या. तत्काळ पोळी - भाजी काढून जेवण उरकले. सकाळच्या कामासाठी आणि चहासाठी पद्मावती तळ्यातील पाणी भरून घेतले. पाणी खराब आहे पण पर्याय नाही. सर्व आटपून झोपायला १०.३० वाजले.

१८ फेब्रुवारी २०१२

ला चहा तयार ठेवतो असे सांगितल्याने मला .३० ला उठणे भाग होते. सामान रात्रीच काढून ठेवले होते त्यामुळे स्टोव्ह पेटवून, पाणी गरम करणे आणि ready mix चहा त्यात घालणे एवढेच काम होते. परंतु काही केल्या स्टोव्ह (MSR) चालूच होईना. सर्व प्रयत्न केले पण व्यर्थ. सकाळी मदत करेन असे आश्वासन दिल्याने म्याडम (स्वाती) उठल्या. जागेवरूनच त्यांनी / निरर्थक सल्ले दिले. स्टोव्ह काही दाद देईना. "हे उठले कि त्याना दगड घेऊन यायला सांग आणि चूल पेटव" असा मौलिक उपदेश करून, म्याडम स्लीपिंग ब्यागमधे घुसल्या. मग परत "कठीण समय येता, लीडर कामास येतो" या वचनास स्मरून बाहेर पडलो. देवळापाशी / चुलींसाठी दगड लावलेलेच होते, लाकडाचा पत्ता नव्हता. लाकडे शोधत चक्कर मारताना पद्मावातीदेवी मंदिराच्या मागे लाकडे सापडली. (बहुदा पुजारी किंवा कुणी तरी साठवून ठेवली असावीत) लाकडे लंपास करून, चुलीत घातली आणि एकदाचे पाणी गरम झाले. काल बरीच चाल झाल्याने आज लवकर उठायच्या मूडमधे कोणी नव्हते. आपटे काका आणि मी सोडून बाकी सगळे हो-नाही करत उठले, मग सकाळचे कार्यक्रम आटोपून निघेपर्यंत चे, .४० झाले.

अजून झोप उडालेली नाही. राजगडाहून निघताना. 
महाराज, राजगड, पद्मावतीदेवी, रामेश्वर, सार्यांना वंदन करून, त्यांचे आशीर्वाद घेऊन निघालो. आजचे लक्ष्य होते 'मोहरी'. सदरेपाशी काही काळ थांबलो. त्याच्या बांधकामावर खर्च केलेले ८० लाख कुठे दिसतायत का ? ते पाहण्याचा प्रयत्न केला. आमच्या अल्पमती नजरेला काहीच दिसले नाही. मागे दूरवर सिंहगडाच्या TV tower चा दिवा दिसत होता. बालेकिल्ल्याला वळसा घालून संजीवनी माचीवर आलो. संपूर्ण माची फिरून पाहण्याची इच्छा होती पण वेळे अभावी नाळेची तटबंदी आणि एक चिलखती बुरुज, आत उतरून पाहून घेतला. राजगडाचा निरोप घेऊन अळू दरवाज्यातून बाहेर पडलो. वेळ .५०.

माचीला डावीकडून (वाट दिसत आहे) फेरी मारून उजव्या हाताला रीजवर आलो.


संजीवनी माची उजवीकडे ठेवत तिच्या टोकाशी आलो. आता समोर तोरणा दिसत होता. एक छोटीशी लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे - सिंहगडाच्या साधारण दक्षिणेला राजगड आहे आणि राजगडाच्या पश्चिमेला तोरणा. म्हणजेच संजीवनी माचीपाशी आपण काटकोनात वळतो राजगड - तोरणा यांना जोडणाऱ्या डोंगररांगेवर येतो. या प्रसिद्ध डोंगररांगेवर (रिज) आमचा प्रवास चालू झाला.

कोले खिंडीत उतरताना - मागे संजीवनी माची

प्रथम एक मोठा उतार उतरून कोले खिंड. मग चढ. अशी वर - खाली, वर - खाली जाणारी ही वाट आहे. वाटेत आम्हाला भागोजी ढेबे भेटले. राजगडावर निघाले होते. आपटे काकांशी त्यांचा परिचय होताच. राम-राम झाले, ख्याली खुशाली विचारली गेली. भागोजींचे घर हा एकमेव आसरा या रिजवर आहे. भागोजींचा निरोप घेऊन, घरात आम्हाला पाणी पाजायला कुणीतरी आहे ना ? याची खात्री करून चालायला सुरुवात केली. एका खिंडीतून (बापुची खिंड) डांबरी सडक गेलीय. ती ओलांडून समोरच्या डोंगरावर चढलो आणि लगेचच भागोजींचे घर आले. वेळ . . ठरल्याप्रमाणे बाकरवडी, केक, बिस्कुटे असा नाश्ता करून घेतला. भागोजीच्या सौ नी हंडे पाणी दिले. त्यानाही पाणी लांबून आणावे लागते म्हणून सर्वांनी पाणी मनसोक्त पिऊन घेतले आणि अर्ध्या अर्ध्या बाटल्या भरून घेतल्या.

शार्प .२० ला निघालो. वाटेत झाडी चांगली आहे. काल जसा उन्हाचा तडाखा जाणवत होता तसा आज जाणवत नव्हता. वाट एका देवराईतून जाते. देवराईत काही देवही मांडले आहेत. पुढे आम्ही थोडे भरकटलो. मुख्य वाट डावीकडे वळसा घेते आणि धनगरवाड्यात जाते. तिला उजवीकडे एक फाटा फुटला आहे जो पुढच्या डोंगरावर चढतो. ही डोंगरावर चढणारी वाट योग्य आहे. डोंगर चढायला लागू नये म्हणून तिला वळसा घालणारी वाट घेऊया या उद्देशाने डोंगराला उजवीकडून वळसा घालणारी वाट आपटे काकांनी घेतली. फारशी वापरातली ही वाट नाही. त्यामुळे थोडी शोधावी लागली. पण काकांचा हा रूट खूप वेळा झाला असल्याने कुठे जायचे आहे हे त्यांच्या डोक्यात पक्के होते. वळसा घेऊन आम्ही मुख्य वाटेला लागलो.

तोरण्याकडे जाताना

आता झाडी कमी झाली होती. बुधला आता जवळ दिसत होता पण त्याच्या पायथ्याची खडी चढाई नुसती पाहूनच घाम फुटत होता. हिय्या करून त्या चढाईला भिडलो. एका लयीत पावले टाकत, थांबता चढाई पार करून रड्तोंडी बुरुजाच्या खाली पोहोचलो. बुरुजाला वळसा घालून वाटेतील भक्कम लोखंडी शिडी चढून भिकुली बुरुजातून तोरण्यावर पोहोचलो. वेळ दु. १२.

रड्तोंडी बुरुजाच्या चढाई दरम्यान मागे वळून पाहताना 

पाणी पिऊन निघालो. सकाळी जिथे होतो त्या राजगडाला राम-राम केला आणि बुधाल्याला वळसा घालून राजगडाच्या विरुद्ध दिशेला असलेल्या वळनजाई दरवाज्यात पोहोचलो.

वळण्जाई दरवाज्यातून पुढे आल्यावर मागे पाहताना. समोर दिसणारा बुधला आता मागे दिसतोय.   

दरवाज्यातून निघून आडवे चालत (वाट अरुंद आहे), उघड्यावरील वळनजाई देवळापाशी आलो. वाटेवर पाण्याचे टाके आहे, त्याच्या वरच्या बाजूला मंदिर आहे. एका भव्य शिळेला शेंदूर लावलाय. भाविक त्याची पूजा करतात. देवीला बांगड्या अर्पण करतात. एका काठीला या (हिरव्या) बांगड्या घातलेल्या आहेत. देवीच्या छायेत बसून जेवण करायचे ठरले. सोबत आणलेले ठेपले, कालच्या सांजा पोळीलोणचे, जाम बाहेर पडले. जेवण करून थोडा आराम केला. पाणी भरून घेतले. टाक्याच्या बाजूलाच भट्टीमध्ये उतरणारी वाट आहे. खाली भट्टी गाव दिसत होते. तासाभरात उतरू असा अंदाज केला. दीडला उतरण्यास सुरुवात केली. तोरण्याहून निघालो खरे पण त्याला वचन देऊन कि पुढल्या वेळी असे घाईघाईत येणार नाही, मुक्कामालाच येऊ.

ही वाट म्हणजे फुल टू घसरगुंडी. बाजूच्या कारवीचाच काय तो आधार. पुढे जाणार्यांनी त्याही तोडून टाकल्या कि शेवट येणार्याची कडी पातळ.

भट्टी कडे उतरताना - घसारा टप्पा संपवल्यावर

घसारा संपून झाडीत घुसलो. मग थोडी सपाट चाल चालून उजवीकडील टेप गाठले. टेपावरून सरळ अस्पष्ट वाटेने भट्टी गावातील वळनजाई देवळापाशी उतरलो.

भट्टीत उतरल्यावर वाटेतील वळण्जाई मंदिर. (फोटो सौजन्य - सारंग)  

देवळाचा कळस मधेच झाडीतून डोकावत राहतो. इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी, ही खूण. देवळाला लागुनच व्यायामशाळा आहे. गावातील रस्त्याने १० मिनिट चालल्यावर सुरेख अशा राम मंदिरासमोर विसावलो. वेळ. दु. .१५. मंदिराच्या आवारातील प्रवेश कमानीखाली अत्यंत रेखीव विरगळ आहे.

राम मंदिर - भट्टी (फोटो सौजन्य - पिनाक)


राम मंदिर (भट्टी) - प्रवेश कमानी लगतची विरगळ. 


मंदिरासमोरून केळद - वेल्हा डांबरी रस्ता जातो. काकांनी खटपट करून एका मावशींना चहासाठी पाणी गरम करून देण्यास तयार केले. थोड्या वेळात (ready mix) चहा तयार झाला. चहाला 'अमृत' का म्हणतात ? याची जाणीव अशा वेळी प्रकर्षाने होते.

थोडा ब्रेक घ्यायचे ठरले. त्यावेळात अनुपच्या पायाला मलमपट्टी करून दिली. त्याला सर्वात अधिक blister होते. त्याची परिस्थिती सारंगच्या शब्दात सांगायची तर - " जेव्हा आपण रेस्ट घेतो तेव्हा तुझा सगळा वेळ पट्ट्या काढण्यात आणि लावण्यात जातोय." अशा ही परिस्थितीत पठ्ठ्या चालला मात्र, एकदाही कुरकुर करता. भट्टीत पाणी भरायला विहीर आहे असे कळले. विहिरीवर निघालो तर तुम्हाला नाही जमणार असे काहींचे मत, तर काहींचे म्हणणे 'जाऊ दे ना विहिरीवर !' भल्या मोठ्ठ्या विहिरीवर पोहोचलो, आत डोकावले तर पाणी ३०/३५ फूट खाली. सुदैवाने मापाचा पोहर्या तिथेच होता. पाणी भरून घेतले. भट्टीतून निघे पर्यंत .३५ वाजले. आता गेळगाणी आणि पुढे मोहरी एवढा पल्ला गाठायचा होता.

गेळगाणी बर्यापैकी वर आहे, राम मंदिरासमोरील रस्ता ओलांडून, शेतातील वाटेने, धरणावरून नदी पार केली. हे छोटेसे पण प्रॉपर धरण आहे. दरवाजे आहेत, पाणी नाहीये. इथून पुढील रस्त्याचे वर्णन करणे मुश्कील आहे. बर्याच वाटा फुटतात. आम्ही काकांच्या मागे निर्धोकपणे चालत होतो. वाटेत वेळा टेकड्या चढलो. गेळगाणीला पोहोचलो तेव्हा .४५ वाजले होते. तेवढ्यात सारंगच्या लक्षात आले कि त्याचा पाऊच वाटेत थांबलो तिथेच राहिला. जाऊ नको सांगितले तरी हा एकटाच सुटला सुद्धा. अंधार पडायची वेळ होत होती, याला मागे जायला आणि परत यायला वाट सापडेल का याची आम्हाला काळजी, गावातला एक माणूस बरोबर देता आला असता. मग रोहित गावातील माणसाबरोबर मागे जायला तयार झाला. आता वाट पाहण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. शाळेच्या बाहेर बसून time पास केला.


एका मुलाने विचारातच पाण्याचा हंडा समोर आणून ठेवला. माणुसकी, माणुसकी, निखळ माणुसकी !! गाव १०/१२ घरांचे आहे. मुले चिक्कार आहेत. ती आमच्या भवती जमा झाली. बिस्कुटे दिल्यावर जादूची काडी फिरवल्यासारखी गायब झाली. सारंगचे नशीब बलवत्तर होते. पाऊच सापडला आणि वाटेत रोहित/गाववाला ही भेटले त्यामुळे वाट चुकता गेळगाणीत पोहोचला. या धामधुमीत तास गेला.

केव्हाही अंधार पडेल अशी स्थती होती. अंधारात मोहरीच्या वाटेची खात्री काकांना नव्हती. मग त्याच गाववाल्याला वाट दाखवायला विनंती केली. जोडीदार म्हणून त्याचा भाऊ ही बरोबर आला. रघुनाथ जानकर आणि रामचंद्र जानकर अशी त्यांची नावे. जानकर बंधूंच्या मागे आम्ही यंत्रवत चालत होतो. 'वायफळ-बडबड-शिरोमणी' पिनाक सोडला तर कोणाचाच आवाज येत नव्हता. मधेच जानकरांकडे ' अजून किती वेळ ?' अशी चौकशी व्हायची. त्याला ' तुमी हळू चालताय म्हनून येळ लागतोय' असे उत्तर मिळे. दिवसभर चालल्यावर अजून जोरात चालायचे त्राण होते कोणा लेकाच्यात ? येईल तेव्हा येईल असा विचार करून आम्ही चालत राहिलो. एका सारखेच दिसणारे - traverse मारले. प्रत्येक traverse नंतर मंगेश 'आता आले' म्हणायचा. त्याचा हा रूट आधी झालाय. पण / traverse नंतर त्याचे ऐकू येईनासे झाले. वाटेत डाव्या हाताला खाली दिवे दिसत होते. ते हरपुड गाव. आमचा वेग अगदीच वाईट नव्हता. वाटेत हरपुड वाडी लागली. उसंत नसल्यासारखे पुढे निघालो. तासात हरपुड वाडीच्या पुढे बामजीच्या घरी पोहोचलो. वेळ रा. .००.

घर मोठे आहे, गुरे आत बांधल्याने घरात सर्वांना जागा नव्हती. बाहेर उघड्यावर झोपण्यात आम्हाला प्रोब्लेम नव्हता. झ्याक सूप बनवले, पिनाकने. (म्हणजे मी चूल पेटवली, कुणीतरी पाणी आणले, मंगेशने सूप घातले आणि पिनाकने ढवळले).

पिनाकचे सूप (फोटो सौजन्य - सारंग)

जेवणासाठी बांधून घेतलेल्या पोळ्या आणि सोबत आणलेले आम्रखंड होते. मी खुश होतो कारण ४० पोळ्या आम्रखंड याचे वजन कमी झाले. जानकर बंधूना परत जायचे होते. त्यांना पोळ्या आम्रखंड बांधून दिले. इथे पाणी काटकसरीने वापरायचे असल्याने प्लेटा / भांडी धुता तशाच ठेवल्या. जेवणाचे सामान उंचावर टांगून ठेवले. सर्व आटपून झोपेतो १०.३० झाले. डोळे मिटताना गुलजार साहेबांचे "थोडीसी जमीं, थोडा आसमां, तिनकोंका बस, इक आशियाँ " हे शब्द कानात गुंजत होते. ताऱ्यांकडे पहात कधी डोळे मिटले समजलेच नाही.

१९ फेब्रुवारी २०१२


बामजीच्या घराबाहेर

अंमळ उशिराच उठलो, .३० ला. मंगेश चहा आणि रेडी पोह्यांच्या खटपटीत होता. त्याला मदत करू असे रात्री आश्वासन देणारे कुणीही चुली शेजारी दिसत नव्हते. बेट्याने झटाझट करून चहा आणि पोहे बनवले. पोह्यांचा अंदाज चुकला कि आम्ही कमी खाल्ले... काहीही असो, पोहे उरले. आवराआवर करून निघेतो वाजले. आता पुढे आम्हाला काहीही बनवून खायचे नव्हते म्हणून बामजीला आमच्याकडील मीठ, मसाला, तेल, रॉकेल सगळे दिले. वर २०० रुपये आसरा आणि पाण्याचे दिले. इथेही पाणी लांबून आणावे लागते म्हणून पुढे मोहरीत पोहोचेपर्यंत लागेल एवढेच पाणी भरून घेतले.

काही वेळातच कच्ची सडक लागली. कच्च्या सडकेवर एक मंदिर आहे. तिथून सरळ पायवाटेने खाली उतरले कि मोहरी. आता लिंगाणा आणि रायगड दर्शन देत होते. लक्षात असू दे कि लिंगाण्याच्या आधीचा जो डोंगर दिसतो त्याच्या पलीकडच्या बाजूला जायचे नसून जी बाजू आपल्याला दिसते त्याच बाजूने सपाटीवरून त्याला वळसा घातला कि पोहोचलो बोराट्याच्या नाळेत. सरळ गेलो तर १० मिनिटात रायलिंग पठार.

वाटेतील मंदिरापासून पुढे आल्यावर दिसणारा लिंगाणा आणि रायगड. लिंगाण्याच्या आधीच्या डोंगराला  सपाटीवरून याच बाजूने traverse मारायचा.    

बामजीकडून निघाल्यावर अर्ध्या तासात मोहरीत मोऱ्यांच्या घरात पोहोचलो. काल हरपुड वाडीच्या पुढे राहिल्याचा फायदा झाला. चटकन मोहरीत पोहोचलो. इथे पाणी मुबलक होते. मुखमार्जन करून घेतले. पाणीही सार्यांनी भरून घेतले कारण लिंगणमाचीत पाणी मिळाले नाही तर पाने पर्यंत पाणी नाही हे माहित होते.

मोऱ्यांच्या घरात / पोरे खेळत होती आणि सौ. परत गर्भवती होत्या. कुटुंब नियोजनाच्या सरकारच्या योजना इथपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. हीच परिस्थिती गेळगाणीतही होती. पुण्याच्या एका ग्रुपचा लिंगाणा क्लायम्बिंगचा कार्यक्रम होता. ते टेम्पो traveller घेऊन मोहरीत आले होते. त्यांचा ड्रायवर तिथेच भेटला.

.४५ ला निघालो. वर लिहिल्याप्रमाणे सपाटीवरून वळसा मारण्याऐवजी डोंगरावर चढू लागलो. काकांच्या लगेच लक्षात आले मग बरोबर वाट शोधली. आणि मार्गाला लागलो. बोराट्याची नाळ सुरु होते तिथे खूण म्हणून लगोऱ्या रचून ठेवल्यात. इथे डावीकडे झाडीत नाळ सुरु होते. चिंचोळी नाळ आहे. स्याका लगोर्यान्पाशी ठेवून रायलिंग पठाराकडे निघालो. वेळ .००. लिंगाणा पहावा तर रायलिंगवरूनच.

रायलिंग पठारावरून लिंगाणा

येथे कैदी ठेवत असे ऐकले आहे. काय बिशाद कि तो पळून जाण्याचा प्रयत्न करेल, पडला तर थेट पाताळातच. लिंगाण्याच्या मागून रायगड बोलावत होता. मुक्कामाला पोहोचतोच असे सांगून रायलिंगहून माघारी फिरलो, लगोर्यान्पाशी आलो. चिक्की-लाडू खाऊन १० ला नाळ उतरायला सुरुवात केली.

नाळीत दगडांचा सागर आहे. रस्ता असा नाहीच. आपल्याला सोपे वाटेल तिथून उतरत राहायचे. उतरत - उतरत एका rock patch पाशी आलो. स्याका पास करून तो पार केला.

बोराट्याच्या नाळेतील rock patch. डावीकडे बाण आहे.   (फोटो सौजन्य - सारंग)

patch च्या खाली माश्या भुणभुणायला लागल्या. क्षणात, भैरवगडला माश्या चावल्याचा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला. नचिकेतने त्याच्या ब्लॉगमधे येथे (नाळेत) माश्या आहेत असा उल्लेख केला होता ते ही आठवले. २५०/३०० मधमाश्या चावण्याचा दांडगा अनुभव पाठीशी असल्याने, इथून लवकरात लवकर सटकणे हा एकच मार्ग मला दिसत होता. यावेळी माशीला झटकण्याची किंवा मारण्याची चूक केली नाही. तशीच सुचना इतराना दिली त्यामुळे काही वेळाने (त्यांच्या एरियातून पार झाल्यावर) माश्या गायब झाल्या. patch च्या खाली लगेचच उजव्या डोंगराच्या (रायलिंगच्या) पोटातून अरुंद वाट आहे.

बोराट्याच्या नाळेतील बोल्ट - इथे नाळेतून बाहेर पडून खिंडीकडे जाणारी वाट घ्यायची. (फोटो सौजन्य - सारंग)

काही ठिकाणी expose आहे. सुरुवातीला एक बोल्ट आहे. बोल्ट safe climbing initiative या संस्थेचे वाटले. असेच बोल्ट तेलबैलावर पाहिल्याचे आठवते. लिंगाणा क्लायम्बिंगचा कार्यक्रमवाल्यांनी या traverse वर रोप लावला होता. कसलेल्या फिरणार्याला रोपची गरज नाही. traverse मारून लिंगाणा / रायलिंगच्या मधील खिंडीत पोहोचलो. वेळ ११.

खिंडीत झाडी आहे, बसायला मस्त दगड आहेत. पाण्याची सोय असती तर अडचणीच्या वेळेत मुक्काम ही होऊ शकतो. वर लिंगाण्यावर कार्यक्रम सुरु होता. नेते आणि १४ सहभागी अशी संख्या होती. ७वर्षाचा एक सहभागी होता, काही नवीन होते. आम्ही नाळेत शिरलो तेव्हा सहभागी गुहेत तयार होऊन बसले होते, चढाईस सुरुवात व्हायची होती. अंधार पडायच्या आत यांचे काही आटपत नाही असा अंदाज, उगाचच मी बांधला. बाकरवडी / बिस्कुटे खाऊन, पाणी पिऊन ११.३० ला खिंडीतून लिंगणमाचीकडे उतरायला सुरुवात केली. लिंगाण्याकडे तोंड करून उभे राहिले कि उजव्या हाताला वाट कारवीत घुसते, ती घेतली. वाटेवर प्रचंड घसारा (स्क्री) आहे.

खिंडीतून उतरताना लागणारा शोल्लिड घसारा 

बाजूला कारवी, मजबूत वेली आहेत, त्यांचा आधार घेऊन, प्रसंगी त्याला लटकत उतरलो. अशा वेळी घेण्याची खबरदारी म्हणजे - पुढे रहाणे. नाहीतर तिरप्या कॅरमबोर्डवरून उतरण्याचे भोग भोगायला लागतात. कारवी/स्क्री संपल्यावर सुकलेला नाला कम ओढ्यातून वाट खाली उतरते.

खिंडीतून लिंगाणा माचीकडे.  खाली झाड दिसतेय तिथे डावीकडे माचीला जाणारी वाट आहे.

रायलिंग डोंगर सोडून या झाडापाशी लिंगण माचीला वळायचे.


खिंड सोडल्यावर पाऊण-एक तासाने लिंगाण्याच्या डोंगरावर (डाव्या हाताला) वाटेला लागलो. पाउल वाटेने अर्ध्या तासात लिंगाणा माची. वेळ दु. .१५.

झुबल्या कडूचे घर. 

माचीवर आता फक्त झुबल्या कडू, त्याचे कुटुंब आणि गुरे यांचेच वास्तव्य आहे. बाकी घरे बंद करून लोक खाली वसले आहेत. माचीवर विहीर आहे आणि उपसा जास्त नसल्याने पाणी म्होप आहे. आता उन्हात खाली उतरण्यापेक्षा इथेच जेवण थोडा आराम करू म्हणत सोबतच्या पुरणपोळ्या आणि लोणचे असा लंच केला. अडीचला निघालो. विहिरीवर पाणी भरून घेतले. वाट दाखवायला येतो म्हणणाऱ्या झुबल्याला कटवले. मावशीनी त्याला खाली नेऊ नका सांगितले होते. पान्यात गेला तर दारू प्यीऊन येईल ही त्यांना काळजी.

श्री. व सौ. झुबल्या कडू - लिंगण माची 

पान्यात उतरताना सोल्लिड तापलेले होते, भयंकर हिट जाणवत होती, अंगातून वाफा येत होत्या. पायथ्याशी आलो आणि सावली पाहून थांबलो. वेळ. दु. .२०. अर्धा तास दम खाऊन, पाणी पिऊन निघालो. कोरडे नदी पात्र पार केले आणि पान्यात आलो. वेळ .३०. डांबरी सडकेला लागुनच राम मंदिर आहे. राम मंदिरामागे, लिंगाणा उठावलेला आहे. लिंगाणा आणि मंदिर एकाच फ्रेम मधे घेतले. "भाविकांचा देव मंदिरात, आपला डोंगरात." अशी एक (यथा-तथा) कवि कल्पना डोक्यात चमकून गेली.

राम मंदिर - पाने.

आता थांबता पुढचा पल्ला गाठणे अनिवार्य होते. सडकेवरून समोर रायगडाच्या दिशेने चालू लागलो. वाघेरीतील हनुमान मंदिराचा कळस दिसत होता. सडक वळते तिथे सरळ शेतात घुसून, नदी पात्र (पाणी आहे) दगडांवरून पार केले. तिथून वर येऊन सडक पार करून थेट हनुमान मंदिर गाठले. वेळ सं. .३०.

हनुमान मंदिर - वाघेरी 

चहाचा चस्का आला. आता चहा हवाच, असे सगळ्यांचे मत पडले. गावात एकानी प्रेमानी चहा करून दिला, तो घेऊन निघेपर्यंत वाजले. त्यांनी सल्ला दिला कि रायगडवाडीपर्यंत सडकेनीच जा. समोर दिसणाऱ्या टकमकच्या पलीकडे रायगडवाडी. पुढे धरणाचे काम चालू आहे, काही ठिकाणी भरावाच्या माती साठी डोंगर पोखरून काढलाय. त्यामुळे पूर्ण जागेचा नकाशा has changed. / वेळा सडक सोडून मधे घुसलो. पण नंतर लक्षात आले कि आता निमूट सडकेने जाणेच योग्य ठरेल. अंधारही पडत होता. धरणाच्या भिंतीच्या बाजूला सडकेवर आलो आणि चले चलो.

सडकेवर चालून बराच लांबचा फेरा पडत होता हे जाणवत होते पण पर्याय नव्हता. वाघेरी सोडून दीड-एक तास झाला होता. यंत्रवत चालत मी पुढे गेलो. वाटेत जीपवाला भेटला. त्याने ' इथून वर व्हा लगेच रायगडवाडी, सडकेने गेलात तर फिरून जाल' असे म्हणत short cut दाखवला. अक्षरश: मिनिटात रायगडवाडीत पोहोचलो. तिथे कळले कि वाडी रस्त्यापासून ३००/४०० मीटर आत आहे. पाणी भरून घेतले आणि रस्त्यावर येऊन मागून येणार्यांसाठी थांबलो. .३० च्या सुमारास सगळे आले. त्यांना पाणी पाजले. सगळ्यांकडून खात्री करून घेतली कि "अभी भी जान बाकी है". नाहीतर वाडीत राहण्याचा पर्याय मांडला. सर्वांनी मूळ प्लानप्रमाणे आजच रायगड चढायचे असे ठासून सांगितले. आज रायगडावर पोहोचून हॉटेलात जेवण करायचे असा बेत असल्याने शिधा सोबत नव्हता. चीत दरवाज्यातील हॉटेल हीच एक आशा आता उरली होती. काका आणि मी, blister आलेली पावले झपाझप टाकत हॉटेलवाल्याला गाठायला पुढे झालो. अर्ध्या तासात चीत दरवाज्यात पोहोचलो. हॉटेल बंद करून (श्री नागेश देशमुख) झोपायच्या तयारीत होते. या भल्या माणसाने हॉटेल उघडून आम्हाला पोटभर जेवायला घातले. जेवणात तासभर गेला.

१० वाजता रायगड चढायला सुरुवात केली. एका लयीत, थांबता चालत चालत केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर ११.०५ ला महादरवाज्यात पोहोचलो. सकाळी वाजता सुरु झालेली चाल १६ तासांनी पूर्ण झाली. जबरदस्त/अचाट असे हासील केल्याचा अनुभव होता. हा क्षण आठवणीत रहावा म्हणून कधी नव्हे तो सेल्फ timer ने स्वत:चा फोटो टिपून ठेवला.

महादरवाजा गाठलाच. "करून दाखवले".

११.३० पर्यंत सर्व आले. प्रत्येकाच्या बोलण्यात " करून दाखवले " ची भावना होती. मंगेश आधी दोन्ही वेळा तिसऱ्या दिवशी रायगडावर पोहोचला नव्हता. एकदा तिसरां मुक्काम पानेमधेच केला तर नंतर रायगडवाडी. पुढचा तासभर महादरवाज्यात काका भारावल्यासारखे महाराजांवर बोलत होते आणि आम्ही ऐकत होतो. दिवसभराचा थकवा पार उडून गेला. त्या ऐतिहासिक दरवाज्यातील देवडीवर शांत झोप लागली.

महादरवाज्यात गाढ झोपी गेलेली मंडळी.   

२० फेब्रुवारी २०१२

आज वाजता नाश्ता करून जि.. विश्रामगृहातून निघायचे असे ठरले होते. जो जसा उठला तसा जि.. विश्रामगृहात पोहोचला. काकांची तिथल्या रामचंद्रशी ओळख होती. बाजूच्या नळावर सेमी-अंघोळ आटोपून घेतली. आम्ही पोहोचायच्या आत, काका गड फेरीला गेले सुद्धा. चहा - नाश्ता देशमुखांच्या हॉटेलात उरकला. सामान रामचंद्रकडे ठेवले आणि गड फेरीला निघालो. वेळ .१५. शिरकाई देवीला वंदन करून जगदीश्वर मंदिरात आलो. वाटेत पुरातत्व विभागाचे पुन्नरुज्जीवनाचे, पुनर्बांधणीच्या जवळ जाणारे काम पहिले.

पुरातत्व विभागाचे पुन्नरुज्जीवनाचेपुनर्बांधणीच्या जवळ जाणारे काम

जगदीश्वराचे आशीर्वाद घेऊन महाराजांच्या समाधीपाशी तासभर बसलो. काकांकडून अखंड माहिती मिळतच होती. समाधीपाशी गर्दी वाढायला लागल्यावर निघालो.

जगदीश्वर मंदिर, रायगड. ठरवल्याप्रमाणे मोहीम पूर्ण करण्याचे बळ दिल्याबद्दल साष्टांग नमस्कार.  

राजांचा दरबार आणि वाडा हा परिसर डोळसपणे पाहिला. रायगड पाहायचा म्हणजे किमान दिवस हवेत. आता फारच कमी वेळ होता. नाईलाजाने परत फिरावे लागले.


दैवत

च्या दरम्यान उतरायला सुरुवात केली. नाणे दरवाज्यातून उतरायचे ठरले. महादरवाज्याच्या खाली नाणे दरवाज्याकडे जाणारी वाट घेतली. .३० ला आंधळी गुहेपाशी पोहोचलो. तिथून हनुमान (मशीद मोर्चा) मोर्चा मार्गे अडीचला नाणे दरवाजा गाठला.

नाणे दरवाजासमोर, आपटे काका - ६१ व्या वर्षी असा खेची ट्रेक करायला जिगर लागते.

पंधरा मिनिटात चीत दरवाज्यात आलो. वडा/मिसळ पावाचे जेवण घेतले. काही जणांचा शिवरात्र म्हणून उपास होता. उपास एकदम कडक होता. फक्त साबुदाण्याची खिचडी, फराळाचा चिवडा, कलिंगड आणि पेप्सी एवढेच मिळाले.

देशमुखांच्या ओळखीच्या अख्तरने ३०० रुपये घेऊन जीपने महाडला सोडले. दु. .३० च्या मुंबई - बोरीवली बसचे बुकिंग होते. बस खचाखच भरलेली होती. बसने वाशी, तेथून घरी. अशा प्रकारे एक अविस्मरणीय खेची ट्रेक पूर्ण झाला.

ट्रेकचे स्मृतिचिन्ह
ट्रेकचे स्मृतिचिन्ह

राजन महाजन


महत्वाची माहिती - 

श्री. पुरोहित
हॉटेल अरण्यधाम, गुंजवणे - ०२१३०-२८०२५१/ २१८०१९/२०४९३७ / ९४२०८६०६९१

शिवप्रसाद हॉटेल (चीत दरवाजा, रायगड)
प्रो.प्रा. नागेश देशमुख - ९४२२३५५७४५/९२७११२७३६३/९४०४५५७१२५

देशमुख उपहारगृह (रायगड)
नंदकुमार देशमुख - ९४२२६९३१८७/९०११६२९०९०
प्रसाद देशमुख - ९८५०६७६१६८/९४२०६१३४५४

अख्तर (महिंद्र पिक-अप. चीत दरवाजा ते महाड) - ९४२३३८०२६५

झुबल्या कडू, मु. कडसडी लिंगाणा माची, पो. वाघेरी, ता. महाड, जि. रायगड.

sinhgad rajgad torna raigad
trek to sinhgad rajgad torna raigad
sinhgad rajgad torna lingana raigad


31 comments:

  1. झक्क्कास वर्णन!
    बरेच चाललात! :)
    जुन्या आठवणी जाग्या झाल्या.. बोराट्याची नाळ करायची राहिली आहेच अजून..

    बादवे, 'वायफळ-बडबड-शिरोमणी' लोक सोबत असावेत! ;)
    इतरांचा उत्साह कसा टिकणार?

    कॅरमबोर्ड :D

    ReplyDelete
  2. झकास....
    तंगडतोड ट्रेक
    *******
    लिंगाणा आणि मंदिर एकाच फ्रेम मधे घेतले.
    "भाविकांचा देव मंदिरात, आपला डोंगरात."
    अशी एक (यथा-तथा) कवि कल्पना डोक्यात चमकून गेली.
    *****

    यथा तथा नाही.. खरेच छान कल्पना आहे..

    Suhas Joshi

    ReplyDelete
  3. मस्तच !! अफलातून ट्रेक !
    खूप छान लिहिले आहे, फोटोज पण छान आहेत. :)

    ReplyDelete
  4. नचिकेत / सुहास,
    तुमच्या सारख्या पट्टीच्या लिहिणार्यांकडून झालेल्या कौतुकाने आनंद वाटला. धन्यवाद !!

    अनुप,
    धन्यवाद. बरेचसे फोटो इतरांचे उचलले आहेत. तुझी फोटोग्राफी मी पाहिलीय, या क्षेत्रात तू सरस आहेस.

    राजन.

    ReplyDelete
  5. Awesome is not the word. Nice photos and trek Rajan sir. Keep trekking, you are the inspiration.

    ReplyDelete
  6. Mastach Rajan & Gang - Salute to Apte Kaka

    ReplyDelete
  7. va mast rajan ...junya aathvani jagya zalya...aamhi pan Apte kakan sobatach kela hota...!

    ReplyDelete
  8. Excellent narration! Congratulations to the entire team!!

    ReplyDelete
  9. जयराम/पराग/आशु/तुषार,

    धन्यवाद.

    राजन

    ReplyDelete
  10. khoop chhan. sarv padyatrikanche manpoorvak abhinandan. sangrhaniy mahiti. poonha ekda abhinandan.

    - chandrakant r satam.
    9819028012.

    ReplyDelete
  11. ekdam massst !!!!!!!!!!
    Kharach .............. mahadarvajyatun aat yetana saglyanchya tondat hech vakya hota ..... "Karun dakhavle"

    ReplyDelete
  12. ट्रेकचे स्मृतिचिन्ह एखाद्या ऑलिंपिक मेडलपेक्षा भारी आहे.

    ReplyDelete
  13. Well written, nice information - keep it up! :)

    ReplyDelete
  14. Excellent write-up and extraordinary route ..! This is the kind of explanation that I always dream of, but never end up writing.

    Keep up the good work..!

    ReplyDelete
  15. Lai Bhari!!!!!mast jamlay blog.....sampurn trek punha kelyasarkhe watle....mala ajunhi athavto to mahadarvajyat pravesh kartanacha kshan....kasle bhannat feeling hote te...a great sense of achievement...tharvale te karun dakhavalyache..ek avismarniy anubhav...loved d trek...loved our team...n kudos to Aaptekaka, u n mangesh for making it possible...thanx a ton...

    ReplyDelete
  16. ekdam massst !!!!!!!!!!
    Kharach .............. mahadarvajyatun aat yetana saglyanchya tondat hech vakya hota ..... "Karun dakhavle"

    ReplyDelete
  17. Guru Rajan,
    Superb trek route & blog. Hats off to you, team & Apte kaka.

    Cheers,
    Sameer Sagwekar

    ReplyDelete
  18. अगदी तुमच्यासमवेत मोहिम केल्याच्या दमणुकीचा अनुभव तुझ्या या लेखाने दिला. मीही आपटेकाकांबरोबरच ही मोहिम केली आहे. सर्वप्रथम त्यांना मग तुम्हां सर्वांना हॅट्स ऑफ!! सुरेखपैकी खेची ट्रेक आहे हा..!! तुझं धावतं वर्णन इतकं भारी आहे की लेख एका दमातच वाचावा लागतो. सगळे फोटोही अप्रतिम आहेत. तुझे खूप अभिनंदन या अप्रतिम लेखाबद्दल..
    - हेमंत

    ReplyDelete
  19. Rajan
    After reading your blog it refershed my memories of a treck which i did in 1981 on the same route but it was 5 days. Great keep it up.

    ReplyDelete
  20. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  21. Koopach mast Rajan
    I wish to go for trekking with you.
    And Aaptekaka Hat's Of you . Becouse of trekkers like you we new trekkers really have a good inspiration.
    Once again People...
    Great Job...

    ReplyDelete
  22. Khupach sunder bandhu.... blog far avadala..

    ReplyDelete
  23. farach sahi....
    aamcha lavkarach raajgad to raigad cha bet aahe.
    tujha blog madatila aahech...
    trek karat raha...
    Chatrapati Shivaji Maharaj kee Jai.........

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद ! तुमचा ट्रेक झाला कि कळवणे. अद्ययावत माहिती मिळेल.

      Delete
  24. जबरदस्त ट्रेक आणि परफेक्ट लेख. अतिशय उपयोगी.

    ReplyDelete
  25. फारच सुरेख वर्णन राजन,
    मी खरेतर साल्हेर किल्ल्याच्या एका लिंक वरून आलो इथे. पण आपला साल्हेर चा लिख काही सापडू शकला नाही.
    पण आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन, तसे झाले.मस्त.
    बागलाण ट्रेकची अद्ययावत माहिती आपणास इथे मिळू शकेल.
    http://sagarshivade07.blogspot.in/
    वेळ मिळाला तर जरूर वाचा.

    ReplyDelete
  26. राजन खूप मस्त लिहिले आहे.
    वर्णन फारच मस्त केले आहे.

    ReplyDelete
  27. Hello Rajan Sir,
    I am doing this trek next week, 22-25 Oct, 2015.

    I would like to know any contact numbers except you have given in the blog for any food arrangements on the way so as to reduce to load.

    And your blog is so awesome that we are planning it since 2 years and somehow we have managed to plan it in next week.

    ReplyDelete