Monday, November 29, 2010

नगरधन किल्ला

नगरधन किल्ला (जिल्हा – नागपूर)

नागपुरात आल्यापासून हा किल्ला पाहायचे ठरवले होते पण उगाचच भेट पुढे पुढे ढकलत होतो. अखेर आज मुहूर्त मिळाला. सोबतीला होता, आशिस मुखर्जी, माझा कार्यालयातील सहकारी. नागपुरातून 8.30 ला, मी बजाज Calibre वर आणि आशिस होंडा activa वर, निघालो. सरासरी 50 की.मी. प्रती तास या वेगाने, कामथी - कन्हान मार्गे मनसरला पोहोचलो. मनसरला राष्ट्रीय महामार्ग ७ [नागपूर – जबलपुर (हाच मार्ग पेंचला जातो)] सोडून उजवीकडे, रामटेकच्या रस्त्याला लागलो. साधारण ३/४ की.मी.वर शीतलवाडी गाव आहे. तेथून परत उजवी घेतली आणि मौदा रस्त्याकडे वळलो. येथून मौदाकडे जाताना 5 की.मी.वर नगरधन गाव आहे. नागपूरपासून नगरधन 50 की.मी. असेल. गावातल्या अरुन्द - कच्च्या रस्त्यावरून, पलीकडच्या टोकाकाडील (भुईकोट) किल्ल्याकडे आलो. घड्याळत १०.३० झाले होते.


लांबवरुन हा किल्ला, लाल किल्ल्याची छोटि प्रतिकृती वाटला. नंतर कळले की ही किमया किल्ला बांधणार्यांची नाही तर आपल्या पुरातत्व विभागाची आहे. संपूर्ण किल्ल्याला अंतर्बाह्य लालम-लाल प्लास्टर करून टाकलेय. काय बिशाद की तटबांदीचा १ दगड ही नजरेस पडेल. उत्तराभिमुख महादरवज्यातुन किल्ल्यात दाखल झालो. समोरच किल्ल्याची माहिती देणारा फलक वाचून, दुसर्‍या दरवज्यातुन आत गेलो.

एका गोष्टीचा आनंद वाटला की खूपश्या (गावातील) भुईकोटांप्रमाणे या किल्ल्याकडे येण्याच्या वाटेवर कचरा, मल-मुत्र आदींचा ढीग नव्हता. किल्लाही स्वच्छ आहे.
किल्ल्याची लांबी 102 मीटर आणि रुंदी 88 मीटर आहे. तटबंदी शाबूत असल्याने तटावरून किल्ला दर्शनाला सुरूवात केली.






२०/२५ मिनिटात तटफेरी पूर्ण झाली. मुख्य दरवज्याच्या समोर चौथर्‍याचे अवशेष आहेत. माहितीनुसार ते प्रासादाचे आहेत. त्यातील कारंजेही लक्षवेधक आहे. चारही बाजूने त्याला आत उतरणार्‍या पायर्‍या आहेत. किल्ल्यातील तीन
विहिरिन्पैकि एक विहीर या कारन्ज्याजवळ आहे. ही विहीर मला वैशिष्ट्यपूर्ण वाटली. मोठ्या हौदामध्ये गोल विहीर बनवली आहे. या हौदात उतरण्यासाठी १२/१५ पायर्‍या आहेत. पायर्‍या उतरल्या की आपण गोलाकार खोल विहिरीपाशी येतो. होदाची उंची १२ फुट तरी असेल. माझ्यामते, पाण्यावर जास्त वेळ सूर्यप्रकाश पडून, बाष्पीभवनाने पाणी कमी होऊ नये म्हणून अशी व्यवस्था असावी. या विहिरीच्या पूर्वेला ४ x ४ (अंदाजे) फूट चौकोनी विहीर आहे.




हिच्या पूर्वेला, साधारण 30 पायर्‍या असलेली विहीर आहे.
अशी विहीर आधी पहिलेली होती. पण इथे पण एक खास बात आहे.

या विहिरीच्या बाजूला, जमिनीच्या स्तरापेक्षा १२/१५ फुट खाली, एक लहानसे दालन (खोली) आहे. या दालनात येण्याचा मार्ग विहिरीच्या पायर्‍यापासून पूर्णत: वेगळा आणि चिंचोळा आहे.

माहितीनुसार या दालनाचा वापर ग्रीष्म (उन्हाळा) ऋतूमध्ये विश्रांतीसाठी करण्यात येत असे. म्हणजे वीना वीज वातानुकुलित यंत्र (एयर कंडीशनर विदाउट एलेक्ट्रिसिटी).









किल्ल्याच्या दक्षिणेला अजुन एक द्वार आहे. किल्ल्याचे काही बुरूज षटकोनी, काही आयताकृती आहेत. सव्वा तासात किल्ला पाहून झाला.
















मनसर – रामटेक रस्त्यावर परत आलो आणि खिंडसी धरण / जलाशयाकडे निघालो (शीतलवाडी पासून
६ / ७ की. मी. व रामटेकच्या पुढे ३ की. मी.). खिंडसी येथे मेघदूत रिज़ॉर्ट्स हे एम्. टी. डी. सी. चे हॉटेल आहे. अप्रतिम ठिकाणी हे रिज़ॉर्ट बांधलेले आहे. प्रत्येक खोली मधून विस्तीर्ण जलाशयाचा नजरा दिसतो. निवांतपणे राहण्यासाठी उत्तम ठिकाण. नुसते पडून राहण्याव्यतिरिक्त काही करायची इच्छा असल्यास, जल विहाराची सोय आहे. आम्ही जेवण इथेच आटोपले. जेवण मस्त होते. (phone 0712 - 2533325, 9422460148)

खिंडसीहून रामटेकच्या प्रसिद्ध मंदिरकडे मोर्चा वळवला. पण रामटेक भ्रमंती थोडक्यात आटोपती घेतली. कारण सर्व देवस्थानांची स्थिती असते तीच अवस्था रामटेकची आहे….गर्दी, घाण, दुकाने आणि हे कमी म्हणून माकडे.

रामटेकच्या पायथ्याशी असलेला अंबाला तलाव आणि त्याच्या भोवतालचा मंदिरसमूह दुरून, भेट देण्यासारखा वाटत होता पण तिकडे जाण्याची ईच्छाच झाली नाही.

रामटेकहून निघालो आणि थेट नागपुरात येऊन धडकलो. ४.३० ला आमची छोटी सहल पूर्ण झाली.

- राजन महाजन
२८ नोव्हेंबर २०१०

(छायाचित्र सौजन्य - आशिस मुखर्जी)