Thursday, December 23, 2010

संगमरवरी सफर - भेडाघाट

पेंचला जाण्याचे ठरले पण बरीच डोकी एकत्र आली आणि त्या कार्यक्रमाचा बोर्या वाजला. त्या डोक्यांपैकी बर्‍याच जणांच्या डोक्यात पेंचला जाउन मस्त "बसायचे" अशी कल्पना होती, काही जणांना तिथे कशाला जायचे हेच माहीत नव्हते. त्यामुळे तो बेत रद्द करून, मी आणि आशिस भेडाघाट पाहण्यासाठी गुपचुप सटकलो.

शनिवार (11 डिसेंबर 2010) रात्रीची जबलपुर सूपर एक्सप्रेस घेतली. गाडी वेळेत, 9.40 ला निघाली. रात्रीचा प्रवास म्हणून झोपण्याचा जामानिमा चोख बरोबर घेतला होता. पण झोप येईल तर शपथ. समोरच्याच बर्थवर हिंद-केसरी (घोरणे) भयंकर वरच्या सुरात पेटले होते. सपशेल शरणागती पत्करून मी नुसतच या कुशीवरुन त्या कुशीवर वळत राहिलो. आशिसची पण तीच अवस्था होती. मधूनच जोरात बोलून निषेध नोंदवण्याचा प्रयत्‍न करून पहिला. पण हिंदकेसरीने आमच्याकडे तुच्चतेने पाहायला देखील डोळे उघडले नाही. अखेर 3.30 च्या सुमारास हिंद-केसरी कोणत्याश्या स्टेशनवर उतरून गेले आणि आम्ही तत्काळ झोपी गेलो.


सकाळी 7 च्या सुमारास (12 डिसेंबर 2010) गाडी जबलपुरला पोहोचली. स्वस्तात-स्वस्त हॉटेल पाहिजे म्हणून फिरत फिरत हॉटेल दीप पॅलेस मधे खोली घेतली. अत्यंत खराब हॉटेल आहे. खोल्या / टॉयलेट स्वच्छ नाही. आम्हाला फक्त सकाळचे विधी उरकण्यासाठी आणि सामान ठेवण्यासाठी खोली हवी असल्याने तडजोड केली. हॉटेलच्या समोरच "हॉटेल इंडिया" म्हणून मस्त हॉटेल आहे. त्याचे रेस्टोरेंट ही झकास आहे. तिथे नाश्ता हादडला. जवळच्याच करमचंद चौकातुन पूर्ण दिवसासाठी रिक्षा ठरवली. रिक्षावाल्याने (गुप्ता जी) 500 रुपयात, शहीद स्मारक, शिव मंदिर, धुवाधार धबधबा, भेडाघाट, चौसष्टा योगिनी मंदिर, त्रिपूर सुन्दरि मंदिर, मदन महल् किल्ला, राणी दुरगावती संग्रहालय, हे सर्व दाखवण्यासाठी तयार झाला.

9.15 वाजता स्थळ दर्शनाला सुरूवात झाली. गोल-बाजार नामक मोठ्या मैदानाच्या मधोमध शहीद स्मारक आहे. त्याला सर्वप्रथम भेट दिली. शहीद स्मारक म्हणून एक प्रेक्षागृह उभारण्यात आले आहे. इथे विविध भाषांतील सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. अर्ध्या तासात स्मारकाला प्रदक्षिणा घालून, कचनार सिटी येथील शिव मन्दिराकडे निघालो. खड खड करत कचनार सिटीला पोहोचलो. जबलपुरचे रस्ते खूप वाईट आहेत. खड्डे आणि धूळ सर्वत्र आहे. कचनार सिटी नामक गृह संकुलामधे 70 फुट उंच शिव मूर्ती उभारली आहे. पाहून नतमस्तक व्हावे अशी मूर्ती आहे, भव्य आणि सुबक. चोहिकडे हिरवळ, फूलझाडे आहेत. आम्ही पोहोचलो तेव्हा मूर्तीला परत रंग देण्याचे काम चालू होते, त्यामुळे तिला बांबुने घेरून टाकले होते. अतिशय प्रसन्न ठिकाण आहे.

हे पाहून 10.30 च्या सुमारास मुख्य आकर्षण, भेडाघाटकडे निघालो. जबलपुर – इन्दोर मार्गावर, जबलपुर पासून साधारण 22 की.मी.वर भेडाघाट आहे. राष्ट्रीय महामार्ग 7 ओलांडून पुढे, दुतर्फा गहू, सोयबीनची शेती आहे. पाऊण तासात भेडाघाटला पोहोचलो. प्रथम नर्मदा नदितिल, धुवाधार धबधब्याकडे निघालो. धबधबा घाट उतरून, जवळून पाहता येतो आणि 60 रुपयांचे टिकेट काढून रोप वे मधूनही पाहता येतो (हा पावसाळ्यात चालू असतो). माझ्या मते रोप वे मधूनच पाहण्यात मजा आहे. धबधब्याचा विस्तार / आवाका हवेतून नजरेत सामावून घेता येतो. धबधब्याचा विस्तार मोठा आहे, उंची किरकोळ आहे. आपल्या खंडाळा/माळशेज घाटातील कित्येक धबधबे याच्यापेक्षा उंच असतात. रोपवेतून पैल तीरावर गेल्यावर परत फिरण्यासाठी वेळेचे बंधन नाही. आधी विनंती केली तर अर्ध्या मिनिटासाठी रोप वे मध्यावर थांबवतात म्हणजे निवांतपणे फोटो काढू शकतो. आम्ही रोपवेतून आणि पैल तीरावरून मनसोक्त धबधबा अनुभवला, त्याचे तुषार अंगावर झेलले, सप्तरंगी कमान पहिली……..एकूण कल्ला केला.










इथून निघालो, भेडाघाटकडे. मार्गातच चौसष्ठ योगिनी मंदिर आहे. याला “चौसष्ठ योगिनी मंदिर” म्हणतात पण हे आहे गौरी शंकर मंदिर. मंदिर 800 वर्ष जुने आहे. या मंदिरातील मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. नंदीवर आरूढ शिव आणि पार्वती यांची मूर्ती आहे. पूजार्यानी दिलेल्या माहिती प्रमाणे शिव-पार्वतीचा विवाह प्रसंग दाखवणारी ही मूर्ती आहे आणि नंदीवर आरूढ शिव पर्वतीची ही एकमेव मूर्ती आहे (पण फोटो काढण्यास मनाई आहे). मन्दिराभोवती वर्तुळाकार कोनाद्यांमध्ये चौसष्ठ योगीनींच्या मूर्ती आहेत. मोजल्यावर कळले की मूर्ती चौसष्ठपेक्षा जास्त आहेत. त्यात योगिनी व्यतिरिक्ता इतर मूर्तीही आहेत. सर्व मूर्ती भग्नाव्स्थेत आहेत. भुलेश्वर (पुणे) येथे पाहिलेली विनायकीची (गणेशाचे स्त्रीरूप) मूर्ती येथेही आहे. अर्ध्या तासात मंदिर पाहून झाले. पुढेच भेडाघाट आहे.










भेडाघाटला होडीमधून फिरायची सोय आहे. नदीच्या (नर्मदा) दोन्ही बाजूस संगमरवराचे मोठे मोठे डोंगर वजा खडक आहेत. काही ठिकाणी 100 फुटानपेक्षा उंच. संगमरवराचे रंग तरी किती…..पांढरा, गुलाबी, निळा, काळा, सोनेरी, पिवळा. भेडाघाटची खासियत म्हणजे, कोणत्याही वेळी जा (पावसाळा सोडून), तुम्ही निराश होणार नाही. कारण सूर्यप्रकाशाप्रमाणे रंगाच्या छटा बदलत जातात. पौर्णिमेच्या वेळी तर रात्री 8 ते 12 मध्येही ही सफर करता येते. चंद्र प्रकाशात लकाकता भेडाघाट पहाणे हा अविस्मरणीय अनुभव आहे असे कळले. ही 2 की. मी. ची सफर 50 मिनिटात संपते. पण सफर चालू होण्यासाठी, पूर्ण होडी भरेपर्यंत थांबावे लागते. 23 जण (मोठे) पूर्ण होईपर्यंत होडी निघत नाही. प्रत्येकी तिकीट आहे रु. 41. विशेष होडी केली तर 360 रुपये. मोटर बोट पण आहे ती 20 मिनिटात सफर करून आणते.










सफारी मधे 4 नावड्यांपैकी 1 गाइड म्हणून ही काम करतो आणि माहिती देत राहतो, ही माहिती 95% बकवास असते. संपूर्ण माहिती पद्यात सांगितली जाते. करमणूक सोडून त्याला काहीही किंमत नाही. त्यातील काही पद्ये खाली देत आहे. कोणताही दगड पाहून किंवा त्यावरील काही तरी विचित्र आकाराला कोणतेही नाव देऊन किंवा काहीतरी काल्पनिक गोष्ट बनवून ही काव्ये रचलेली आहेत.


काली काली मूर्ति, हात पैर सिर, इसे बोलते है कालभैरव
उज्जैन मे बड़ा भाई, भेडा घाट मे छोटा भाई
वो ड्रिंक लेता है, ये नारियल ख़ाता है लेकिन पीते दोनो भाई, वो अद्धि पिता है, ये पहुआ

जिसका बड़ा भाई हो शराबी, छोटा पिए तो क्या है खराबी.

-----

प्राण जाए पर वचन न जाए
सुनील दत्त, प्रेमनाथ, रेखा

तभी से पड़ी है गड्‍ढे के अंदर रेता
साइडमें गुलाबी कलर (पिंक),
यही बैठी थी रेखा, साड़ी का कलर हो गया पिंक

-----
धर्मेन्द्र, डॅनी, शत्रुघ्न सिन्हा, जंपिंग पॉइंट
यही से जंप लगाया था, धर्मेन्द्र और डॅनी ने
लेकिन उन्होने नही लगाया, उनकी डॉल फेंकी थी
अगर वो जंप लगाते, तो फिरसे दोबारा फ़िल्मोंमे नज़र नही आते
------
"रात का नशा, अभी आँख से गया नहीं" (फिल्म - अशोका) का शूटिंग यही हुआ था.
आयी थी करीना, मे का था वो महीना
उसने किया डांस, हम लोगोने देखा पहिली चान्स
तीन लाख लेके गया ठेकेदार
-----

जिस देश मे गंगा बहती है
पद्‍मिनी डांस करके गाना गाती
"ओ, बसंती पवन पागल, ना जा रे, ना जा रे, रोको कोई
इस लिए अपन भी आगे नही जाएँगे
ये है अपना लास्ट पॉइंट - इस जगह को कहते "स्वर्गद्वार".
------









2.30 च्या सुमारास भेडाघाटहून निघालो ते मदन महल् किल्ल्याकडे. (मार्गातील त्रिपूर सुन्दरि मंदिर पाहण्याचा बेत रद्द केला) किल्ला जबलपुरमधे एका टेकडीवर आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी बॅलेन्सिंग rock पाहिला. किल्ला छोतासा आहे. बरीच पडझड झालिय. एका प्रचंड शीळेच्या आधाराने महाल उभा केलाय. या महालातील सजजयांवरून अवघे जबलपुर पाहता येते. 25 मिनिटात किल्ला उरकला.

आता शेवटचे स्थळ – राणी दुरगावती संग्रहालय. खरे तर हे पाहायला पूर्ण दिवस हवा. विष्णू, शिव, गणेश अशा देवांच्या शिल्पांची वेगळी दालने आहेत. तसेच नाणी, भांडी इत्यादीची दालने आहेत. स्वातंत्र्याचा इतिहास, त्याच्याशी निगडीत पत्रे, कात्रण, आदेश, गोंड साम्राज्याचा इतिहास, त्यांची जीवनशैली दर्शवणारी स्वतन्त्र दालने आहेत. येथे शुल्क आकारून फोटो – वीडियो शूटिंग साठी परवानगी आहे.

आता 4 वाजले होते…जेवण करायचे राहीले होते. ट्रेनचा अनुभव लक्षात घेता, 5.30 च्या बसचे (मन्गलम ट्रॅवेल्ज़) तिकीट घेतले. दीप पॅलेस मधे जाउन सामान घेणे, ट्रेन तिकीट रद्द करणे, भोजन करणे आणि वेळेत बस स्टॅंडवर पोहोचणे या गडबडीत माझे ओळखपत्र हॉटेल मध्येच राहून गेले. ओळख पत्राशिवाय खोली देणार नाही म्हणून हॉटेल मॅनेजरने, ते photocopy काढण्यासाठी ठेवून घेतले होते. धडा मिळाला की प्रवास करताना ओळखपत्राच्या 4/5 photocopy बरोबर बाळगाव्यात.

बसचा अनुभव नक्कीच सुखावह नव्हता. इथे रूस्तम-ए-हिंद (पादणे) ने नागपूरपर्यंत सोबत करून आक्ख्या प्रवासात आमचा छ्ळ केला. तसेच बस ही मेली लोकल होती, थांबत – थांबत 250 की.मी. पार करायला तिने 8 तास घेतले. अखेर रात्री 1.30 ला नागपूरला उतरलो आणि सुटकेचा निश्वास टाकला.

- राजन महाजन

Some Contact Details & Information -
Hotel Deep Palace, Near Karamchand Chowk – 0761 – 4031906 (Dirty / Unhygienic Rooms – starting from Rs. 325/-)

Hotel India, City Coffee House Building, Near Karamchand Chowk - 0761 – 2480093 / 2403179 (Recommended as its clean, spacious & has Good restaurant for all meals. Rooms starting from Rs. 800/- to Rs. 2400/-)

Mangalam Travels, Near Bus Stand - 0761-4044394 (for Jabalpur-Nagpur-Jabalpur Buses) Seat – Rs. 200/-, Sleeper Rs. 250/- (Non AC). There are many other Bus Operators for this route like Khurana Travels.


See this link for more photographs of my visit to Bhedaghat / Jabalpur
http://picasaweb.google.com/mahajan.rajendra/BhedaghatAndAround12December2010#

Expense Sheet for 2

Train Ticket (Nagpur - Jabalpur) - 540
Auto to Deep Palace Hotel - 30
Hotel Rent & Tea - 332
Breakfast (India Coffee House) - 160
Auto for sightseeing 500
Bhedaghat (entry fee) - 30
Dhuadhar Ropeway -120
Bhedaghat (Boating) - 82
Rani Durgavati Museum - 20
Bus (Jabalpur-Nagpur) -400
Lunch - 240
Rabdi/Tea/Ice Cream - 65
Total Expenses -2519